* वैमानिक मुंबईचे रहिवासी
ओटावा, ७ ऑक्टोबर (हिं.स.) : कॅनडात विमान कोसळून झालेल्या अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमान एका झाडावर आदळल्यानंतर अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुघर्टनाग्रस्त झाले. मृतांची नावे अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी असून हे दोघेही मुंबईचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान चिलीवॅक शहरातील मोटेलच्या मागील झाडांवर आदळून हा अपघात झाला, अशी माहिती कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. विमान परिसरातील एका हॉटेलच्या इमारतीच्या मागे असलेल्या झुडपात कोसळले. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.
हिंदुस्थान समाचार
