नाशिक, २१ नोव्हेंबर, (हिं.स) : शिवसेनेच्या युवती सेनेतर्फे पहिली एकदिवसीय महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, सि.बी.एस नाशिक येथे संपन्न झाली.युवती सेनेच्या जिल्हाधिकारी शिल्पा चव्हाण यांच्या पुढाकाराने तर जिल्हा समन्वयक नयना गांगुर्डे, उपजिल्हाधिकारी शिवानी पांडे, माधुरी पाटील,महिला आघाडीच्या अलका गायकवाड,किर्ती र्निगुडे यांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न झाली.
स्पर्धेला नाशिक जिल्ह्यातील 10 महिला फुटबॉल संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.आयोजित स्पर्धेचे सकाळी 10.00 वाजता युवती सेनेच्या जिल्हाधिकारी शिल्पा चव्हाण यांच्या हस्ते खेळाडू,पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सामना अत्यंत अटीतटीचा व उत्साहवर्धक झाला. तर अंतिम सामना जान्हवी ए. व गुनगुन साधवानी सेव्हन या संघामध्ये रंगला.या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जान्हवी ए.या संघाने विजय प्राप्त केला. स्पर्धेत विजेत्या, उपविजेत्या संघातील प्रत्येक महिला खेळाडूला शिवसेना उपनेते सुनिल बागुल, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, देवानंत बिरारी या मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, तर आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवसेना उपनेते सुनील बागूल यांनी युवती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व शिवसेना हा पक्ष सर्व खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही दिली.
स्पर्धा यशस्वीकरण्यासाठी स्पर्धा समन्वयक, क्रीडा संघटक शशांक वझे तर स्पर्धेला पंच म्हणून आकाश छडीदास, विशाखा राजपुत, राज कर्पे, सत्यम गोसावी फुटबॉल प्रशिक्षक व मार्गदर्शक बी.डी.रॉय यांनी काम पाहिले.
हिंदुस्थान समाचार
