नाशिक, ११ जानेवारी,(हिं.स.) – २८ जानेवारी रोजी होणाऱ्या ८ व्या राष्ट्रीय व १३ व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण गुरुवार ११ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय कोच विजेंद्रसिंग,नाशिक जिमखाना प्रमुख नरेंद्र छाजेड, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विनोद शहा,अविनाश खैरनार, मॅरेथॉन आयोजन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल,महेश तुंगार, मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव,डॉ भास्कर ढोके,डॉ डी डी लोखंडे,डॉ विलास देशमुख, प्रा दौलत जाधव,संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले.
यावेळी बोलतांना ॲड.नितीन ठाकरे यांनी ” मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग असतो. हि स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संस्थेचा प्रयत्न असून त्यासाठी नाशिक येथील क्रीडा क्षेत्रातील संस्था व मान्यवर यांचे देखील सहकार्य मिळत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून स्पर्धा यशस्वी केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय कोच विजेंद्रसिंग यांनी यावेळी बोलतांना ” नाशिक जिल्ह्यातील लोकल अॅथलीट व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना एकत्र करून मॅरेथॉन स्पर्धेच्या एक दिवस आधी शहरातून रॅली काढावी. तसेच मविप्र संस्थेने पुढाकार घेऊन डीस्टन्स स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन करावी असे आवाहन केले.
विनोद शहा यांनी मविप्र मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील क्रीडा संस्था तसेच आयएमए,सी ए, इंडस्ट्रीज मधील लोकांना सहभागी करून घ्यावे व मुंबई रन सारखा नाशिक मविप्र रन यशस्वी करावा असे सांगितले.
यावेळी कविता राऊत,नरेंद्र छाजेड,अविनाश खैरनार व मविप्र मॅरेथॉन आयोजन समितीचे अध्यक्ष व संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी जास्तीत जास्त स्पर्धक व नागरिकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
हिंदुस्थान समाचार
