नाशिक, १ डिसेंबर (हिं.स.) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रांतर्गत असणाऱ्या अहमदनगर, धुळे, जळगांव, नाशिक आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील विविध शिक्षणक्रमास प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा महोत्सव रविवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 पासून के. टी. एच. एम. महाविद्यालय, गंगापूर रोड नाशिक येथे आयोजीत करण्यात आला आहे.
या क्रीडा महोत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. जयदीप निकम, संचालक निरंतर विद्याशाखा तथा व्यवस्थापन मंडळ सदस्य, मुक्त विद्यापीठ आणि डॉ. दयाराम पवार, संचालक, विद्यार्थी कल्याण केंद्र, मुक्त विद्यापीठ हे उपस्थित राहणार आहे.
या विभागीय क्रीडा महोत्सवात आतापर्यंत पाच जिल्ह्यांतील एकूण 125 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून, स्पर्धेच्या दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. प्रमोद रसाळ, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, नाशिक विभागीय केंद्र व संयोजन समिती यांनी केले आहे.या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात सहभागी होतील.
हिंदुस्थान समाचार
