– कसोटी इतिहासातील भारतीय संघाचा सर्वांत मोठा विजय
– मालिकेत भारताची २-१ ने आघाडी
– रवींद्र जडेजा सामनावीर
– चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीत
मुंबई, 18 फेब्रुवारी – तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा तब्बल ४३४ धावांनी धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. यामध्ये यशस्वी जैस्वालची द्विशतकी खेळी आणि रवींद्र जडेजाने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय संघाचा हा सर्वांत मोठा विजय ठरला आहे. हा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या विजयाने भारताने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने, तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली होती.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ११२ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. या अष्टपैलू कामगिरीमुळे रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.
इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात रोहित शर्माने १३१ धावांची शानदार खेळी केली. रोहितनंतर रवींद्र जडेजानेही शतक झळकावले. खालच्या फळीत पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने ६२ धावांची शानदार खेळी केली. ज्यामुळे भारताने ४४५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने जोरदार फटकेबाजी केली. त्याने २३६ चेंडूत १२ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने नाबाद २१४ धावा काढल्या. यशस्वीच्या खेळीमुळे भारताने ५५६ धावांची आघाडी घेतली. यशस्वीने सलग तीन षटकार लगावत जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानल्या जाणाऱ्या जेम्स अँडरसनची धुलाई केली. त्यामुळे इंग्लंडला ५५७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. भारताच्या ५५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२२ धावांवर ढेपाळला. भारताकडून रवींद्र जाडेजाने पाच, तर कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. तसेच जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विननेही प्रत्येकी एक गडी तंबूत परत पाठवला.
कर्णधार रोहित शर्माने पहिल्या डावात निर्णायक शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीने वेगळाच योगायोग घडला. त्याने मागील ११ कसोटीत जेव्हा जेव्हा शतकी खेळी केली आहे तेव्हा भारतीय संघ विजयी ठरला आहे.
भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर
यापूर्वी २०२१ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला होता. या मोठ्या विजयासह भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. इंग्लंड विरुद्धची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताचे सात सामन्यांतून ५० गुण झाले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी ५९.५२ वर पोहोचली आहे. भारताने ५५ टक्के गुण मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
