* रोहितचे वनडे कारकिर्दीतील ५४ वे अर्धशतक पूर्ण
* २० वर्षांच्या पराभवाचा घेतला बदला
* भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरूच
लखनौ, २९ ऑक्टोबर (हिं.स.) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत २० वर्षांच्या पराभवाचा बदला घेतला.
लखनौच्या एकना स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ गडी गमावून २२९ धावा केल्या होत्या. २३० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज झटपच बाद झाले आणि भारतीय संघाने २० वर्षांनंतर इंग्लंडला विश्वचषकामध्ये पराभवाची धूळ चारली. धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील सहावा विजय नोंदवला. त्यामुळे आता भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ४९ धावांची खेळी केली. तर मोहम्मद शमीने सात षटकांत इंग्लंडचे चार मह्त्त्वाचे गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने तीन गडी बाद करत इंग्लंडची कंबरच मोडली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ४० धावांत तीन गडी गमावले होते. शुभमन गिल नऊ धावा करून बाद झाला, विराट कोहली खाते न उघडताच तंबूत परतला आणि श्रेयस अय्यर चार धावा करून बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी श्रेयस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर बाद झाला. यानंतर रोहितने के.एल. राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. राहुल ५८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. दरम्यान, रोहितने एक दिवसीय कारकिर्दीतील ५४ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६६ चेंडूत पन्नास धावा केल्या. यानंतर रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. शतकापासून १३ धावा दूर, आदिल रशीदच्या चेंडूवर रोहित शर्मा लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद झाला. त्याने १०१ चेंडूत ८७ धावांच्या खेळीत १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. रवींद्र जडेजा आठ धावा करून बाद झाला.
भारतीय संघ असा एकमेव संघ आहे, जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑल आऊट झालेला नाही. भारतीय संघाची विजयी घौडदौड पुढे सुरूच आहे. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
