मुंबई, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : मुंबईतील एक प्रतिष्ठित स्पोर्ट्स क्लब असलेल्या द बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनद्वारे (बॉम्बे वायएमसीए) १६, १७, १८, १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठ पॅव्हेलियन, न्यू मरीन लाइन्स, मुंबई येथे 46व्या वार्षिक बॉम्बे वायएमसीए राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई शहर जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशनशी संलग्न ही अॅथलेटिक्स स्पर्धा 6 वर्षांखालील ते 19 वर्षांखालील मुले – मुली, पुरुष आणि महिला अशा गटांमध्ये होईल. स्पर्धा फक्त हौशींसाठी आहे. मुंबई बाहेरील सहभागी हे इतर जिल्ह्यांतील क्लब संबंधित जिल्ह्यांशी संलग्न असले पाहिजेत.
बॉम्बे वायएमसीए अॅथलेटिक्स स्पर्धा धावणे (50, 100, 200, 300, 800, 1500, 5000 मीटर धावणे, शटल रिले, 4 बाय 50, 4 बाय 100 रिले आणि हर्डल्स), लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, थाळीफेक अशा प्रकारांमध्ये होईल.
या स्पर्धेत मुंबई शहर उपनगरांसह आजूबाजूच्या जिल्ह्य़ातील हौशी खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन बॉम्बे वायएमसीएचे जनरल सेक्रेटरी लियो सेलिंस यांनी केले आहे.
विविध प्रकारचे खेळ खेळू इच्छिणाऱ्या सदस्यांसाठी बॉम्बे वायएमसीए हा पहिला अॅथलेटिक क्लब 1883 मध्ये स्थापन झाला. अपोलो बंदर येथे सुरू झालेला टेनिस हा त्यांचा पहिला क्रीडा उपक्रम टेनिस होता. पुढे क्रिकेट आणि फुटबॉलला जोडून त्यात अॅथलेटिक्सची भर पडली. हा क्लब गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सदस्यांसाठी विविध क्रीडा (खेळ) उपक्रम आयोजित करत होते. क्लबतर्फे 16 आणि 17 मार्च 1905 रोजी 23 क्रीडा प्रकारांचा समावेश असणारे पहिले वार्षिक क्रीडा संमेलन दोन दिवसीय आयोजित केले होते. बॉम्बे वायएमसीएच्या फिजिकल एज्युकेशन विभागातर्फे सर्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते
हिंदुस्थान समाचार
