कॅनबेरा, 13 ऑगस्ट (हिं.स.)
यस्तिका भाटियाचे अर्धशतक आणि कर्णधार राधा यादवच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे पहिल्या महिला एकदिवसीय सामन्यात भारत अ संघाने ऑस्ट्रेलियाला तीन विकेट्सने पराभूत केले. या विजयासह भारत आता तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. डावखुरी फिरकीपटू राधाने ४५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. तिच्या फिरकी माऱ्यामुळेच भारतीय महिला अ संघाला ४७.५ षटकांत ऑस्ट्रेलियाला २१४ धावांत गुंडाळण्यात यश आले. त्यानंतर यस्तिका भाटिया ७० चेंडूंत ५९ धावांची शानदार खेळी केली. आणि भारतीय संघाला अवघ्या ४२ षटकांमध्येच लक्ष्य गाठून दिले.
यस्तिका भाटियाने शेफाली वर्माबरोबर चांगली सुरुवात केली. आणि पहिल्या विकेटसाठी फक्त १०.४ षटकांत ७७ धावांची भागीदारी केली. शेफालीला सिएना जिंजरने बाद केल्यानंतर भाटिया आणि धारा गुज्जर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारताची धावसंख्या २३.३ षटकांत एक बाद १४० अशी झाली. पण गुज्जर आणि भाटिया लागोपाठ बाद झाले. ज्यामुळे भारत अ संघाची धावसंख्या तीन बाद १५७ अशी झाली. ऑफस्पिनर एलाने तेजल हसबनीस आणि तनुश्री सरकार यांना ३० व्या आणि ३२ व्या षटकांत बाद केले. यामुळे भारतीय संघाची अवस्था पाच बाद १६६ अशी झाली होती. राघवी बिश्तने एक बाजू लावून धरत संघाचा डाव सावरला. आणि ऑस्ट्रेलियाने ठेवलेले लक्ष्य गाठण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
