बंगळुरु, 9 ऑगस्ट (हिं.स.)
कर्नाटकचे
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूजवळ एक नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याची
घोषणा केली आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी ८० हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील.
प्रेक्षक क्षमतेच्या बाबतीत अहमदाबादमधील
नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर हे देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणार
आहे.सिद्धरामय्या यांनी कर्नाटक गृहनिर्माण मंडळाच्या बोम्मासंद्राच्या सूर्या
सिटीमध्ये स्टेडियम बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ते १६५० कोटी
रुपये खर्चून बांधले जाईल.
नवीन
स्टेडियम विद्यमान एम चिन्नास्वामी स्टेडियमपासून २२ किमी अंतरावर आहे. रॉयल
चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजय सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर ते
बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली
होती. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ४ जून रोजी चिन्नास्वामी येथे एक
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांना आपला
जीव गमवावा लागला होता.
१,६५०
कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च कर्नाटक गृहनिर्माण मंडळाकडून उचलला
जाईल. यात केवळ एक क्रिकेट मैदानच नाही तर आठ इनडोअर आणि आठ आउटडोअर खेळांसाठी
सुविधा, एक आधुनिक जिम, प्रशिक्षण केंद्र, स्विमिंग पूल, गेस्ट हाऊस,
हॉस्टेल, हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी एक कन्व्हेन्शन हॉल देखील
असणार आगे. हे स्टेडियम बंगळुरूमधील बीसीसीआयच्या नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसारखे
असण्याची शक्यता आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
