नवी दिल्ली, 16 जुलै (हिं.स.)
भारतीय महिला हॉकी संघाची फॉरवर्ड हॉकीपटू दीपिकाने इतिहास रचला आहे.
प्रतिष्ठित पोलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय हॉकीपपटू
ठरली आहे. २०२४-२५ एफआयएच हॉकी प्रो लीगच्या नेदरलँड्सविरुद्ध केलेल्या शानदार
गोलसाठी तिला हा पुरस्कार मिळाला. जगभरातील चाहत्यांनी या पुरस्कारासाठी मतदान
केले होते.
भारत आणि जागतिक क्रमवारीत नंबर-१ नेदरलँड्स यांच्यात झालेल्या
सामन्यात २१ वर्षीय दीपिकाने ३५ व्या मिनिटाला हा गोल केला होता. त्यावेळी भारत
०-२ असा पिछाडीवर होता. दीपिकाने डाव्या टोकावरून नेदरलँड्सचा बचाव या सामन्यात
भेदला होता. बेसलाइनवर ती धावत आली. डिफेंडरच्या स्टिकवरून चेंडू चिप केला
आणि गोलकीपरला हरवत शानदार पद्धतीने चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. या गोलने
भारताच्या पुनरागमनाचा पाया रचला. आणि हा सामना २-२ असा बरोबरीत संपल्यानंतरभारताने शूटआउट जिंकला होता.
पॉलीग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड हा FIH हॉकी प्रो
लीगमधील सर्वात सर्जनशील आणि कौशल्यपूर्ण क्षणांना सन्मानित करतो. तसेच जगभरातील
हॉकी चाहत्यांच्या मतदानाद्वारे या पुरस्कारांचा विजेता ठरवला जातो. पुरुष गटातहा सन्मान बेल्जियमच्या व्हिक्टर वेग्नेझला देण्यात आला.पुरस्कार
जिंकल्यानंतर दीपिका म्हणाली,
हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. नेदरलँड्ससारख्या बलाढ्य
संघाविरुद्ध गोल करणे स्वतःमध्ये विशेष होते आणि आता इतका मोठा सन्मान मिळवणारा हा
गोल माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी माझे प्रशिक्षक, सहकारी, कुटुंब
आणि दररोज मला प्रेरणा देणाऱ्या सर्वांचे आभार मानते. हा पुरस्कार फक्त माझा नाही
तर संपूर्ण भारतीय हॉकीचाआहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
