सोलापूर, 11 मार्च, (हिं.स.)। वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याच्या वाढत्या वापरामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात महापालिकेने बदल केला आहे. नव्या नियोजनानुसार शहराच्या हद्दवाढ भागात पाच ते सहा दिवसांनी तर गावठाण भागांमध्ये चार दिवसांनी पाणी पुरवठा होईल. हा बदल उन्हाळा संपेपर्यंत कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शहरातील जलस्रोतांवर मोठा ताण येऊ लागला आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या दिवसांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गावठाण भाग तसेच काही उप नगरांमध्ये सध्या तीन दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता चार दिवसांनी करण्यात येणार आहे. पाकणी आणि भवानी पेठेतील जल शुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा हा एक दिवस पुढे सरकला आहे. म्हणजेच तीन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता चार दिवसांनी होणार आहे. त्यामुळे गावठाणातील उप नगरांना एक दिवस उशीरा पाणीपुरवठा केला जाणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
