रायगड, 01 जानेवारी (हिं.स.)
श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये आज नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऍडव्होकेट श्री. अतुल चौगुले यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. प्रशासन प्रमुख तसेच श्रीवर्धन नगरीचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी कार्यभार हाती घेतल्याने नगरपालिकेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने नगरपालिकेच्या सभागृहात साध्या पण अर्थपूर्ण वातावरणात पदभार स्वीकार सोहळा पार पडला.
या सोहळ्यास नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष ऍड. अतुल चौगुले यांनी उपस्थितांना संबोधित करताना श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करणे, स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, रस्ते व अंतर्गत पायाभूत सुविधा विकसित करणे, तसेच पर्यटननगरी म्हणून श्रीवर्धनचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास करणे ही आपली प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच प्रशासनात पारदर्शकता, शिस्त व वेळेचे पालन राखले जाईल. नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यात येतील व त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. अधिकारी व कर्मचारी वर्गाने जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या पदभार स्वीकार सोहळ्यामुळे श्रीवर्धन नगरपालिकेत सकारात्मक बदलांची अपेक्षा निर्माण झाली असून, नव्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके
