रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी स्मृतिप्रीत्यर्थ सहिवी खुली लेख स्पर्धा, तसेच स्व. शालिनी आणि स्व. सदानंद बेंदरकर स्मृती तिसरी खुली कथालेखन स्पर्धा पार पडली. या दोन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केले. त्यांनी वाचनालयाच्या विविधांगी कार्यक्रम-उपक्रमांचा आढावा घेऊन, स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख अतिथी श्रीकृष्ण साबणे यांचा परिचय व सन्मान प्रा. गजानन जोशी यांनी केला. ग्रंथालयाच्या संचालिका शालिनी जोशी यांनी कविता साबणे यांना सन्मानित केले.ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. जोशी यांच्या दीर्घ सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा आढावा अनघा लिमये यांनी घेतला. प्रा. जोशी यांना प्रमुख अतिथी साबणे यांनी त्यांच्या ग्रंथालय चळवळीतील योगदानासाठी गौरविले.
या समारंभात सन्मानित करण्यात आलेले स्पर्धक असे :
खुली लेख स्पर्धा : प्रथम- मोहन अत्रे (भिवंडी), द्वितीय- शलाका वारेकर (रत्नागिरी), तृतीय- राखी तोडणकर (रत्नागिरी). उत्तेजनार्थ- १. ऐश्वर्या शिंदे (लांजा), २. श्रद्धा वझे (कल्याण), ३. स्नेहल चव्हाण (देवरूख). परीक्षक- नचिकेत भंडारी (सांगली).
खुली कथालेखन स्पर्धा : प्रथम- श्रद्धा वझे(काशी यात्रा), द्वितीय- शरयू गीते (तिचं घर), तृतीय- मंजुश्री भागवत(विक्रेता). उत्तेजनार्थ : १. अमित पंडित (एका उद्ध्वस्त ग्रहाची गोष्ट), २. काशिनाथ आमणे (वंशाचा दिवा), ३. राजेश जोशी (आलीया उपोषणी). परीक्षक : प्रा. डॉ. संध्या देशपांडे (चिपळूण).
उपस्थित स्पर्धकांमधून मोहन अत्रे व प्रा. मंजुश्री भागवत यांनी स्पर्धेविषयीचे व वाचन संस्कृतीबाबत अभिप्राय व्यक्त केले.
प्रमुख अतिथी श्रीकृष्ण साबणे यांनी मार्गदर्शन करताना वाचनालय आणि वाचन चळवळ याबाबतची सद्य:स्थिती याबाबतचा आढावा घेतला. वाचनालयाच्या दृष्टीने ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाची गरज व महत्त्व विशद केले. स्वतःच्या ग्रंथपाल कारकिर्दीतील काही अनुभव त्यांनी सांगितले. व्
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. जोशी यांनी केला. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने योगदान करण्याची आज खरी गरज असल्याचे याप्रसंगी प्रा.जोशी प्रतिपादन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक ग्रंथपाल अमृता इंदुलकर, अर्चना राणे, नरेंद्र खेडेकर आणि ग्रंथालयाच्या कार्यकारणी सदस्यांनी मेहनत घेतली.
हिंदुस्थान समाचार
