सोलापूर, 16 डिसेंबर, ( हिं.स) सोलापूर बाजार समितीतील हमालांनी दर वाढवावे, या मागणीसाठी रात्री अचानक संप पुकारला. यामुळे शेतकरी तसेच वाहन चालकांना अर्धी रात्र वाहनातच बसून काढावी लागली.हमालांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे बाजारातील लिलाव यंत्रणा कोलमडली. त्यात विक्रमी कांदा आवक झाल्याने किती कांदा आला, याचा हिशेब लावणे प्रशासनाला कठीण झाले. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला.दर वाढवून मिळावे या मागणीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी गुरुवारी सायंकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे सायंकाळी कांदा घेऊन आलेल्या वाहनांची रांग बाजार समितीच्या आवारात लागली.
हिंदुस्थान समाचार
