पुणे 13 नोव्हेंबर (हिं.स) : प्रवाशांना विविध तपासणीसाठी रांगेत थांबावे लागू नये म्हणून पुणे विमानतळ प्रशासनाने ‘डीजी यात्रा’ ही सुविधा सुरू केली. मात्र, तीन विमान कंपन्यांचे ‘डीजी यात्रा’शी एकीकरण (इंटिग्रेशन) न झाल्याने या विमान कंपन्यांच्या प्रवाशांना टर्मिनलवर प्रवेशापासून ते विविध तपासणीसाठी रांगेत थांबावे लागते.दिवाळीच्या सुटीनिमित्त विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी असताना संबंधित विमान कंपन्यांच्या हलगर्जीपणाचा फटका प्रवाशांना बसत आहे. शिवाय प्रवाशांच्या रांगा वाढत असल्याने त्याचा ताणही विमानतळ प्रशासन व ‘सीआयएसएफ’ यांच्यावर पडत आहे.पुणे विमानतळावर डीजी यात्रा सुरू करण्यासाठी तब्बल एक वर्ष चाचणी घेण्यात आली. ३१ मार्च २०२३ पासून ही ॲप आधारित सेवा सुरू झाली. या सेवेमुळे प्रवाशांना ‘चेक-इन’साठी ओळखपत्र घेऊन रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. प्रवाशांना बोर्डिंग पाससह अन्य महत्त्वाची कागदपत्रे याच ॲपवर उपलब्ध होतात. त्यामुळे ते प्रत्यक्ष दाखविण्याची गरज नाही.शिवाय प्रवाशांचा ‘चेहऱ्या’ची नोंदही आधीच या ॲपमध्ये झाली असल्याने प्रवाशांचा चेहरा ‘बोर्डिंग पास’प्रमाणे काम करतो. यामुळे प्रवाशांच्या वेळीची बचत होते.
हिंदुस्थान समाचार
