पुणे 3 जानेवारी (हिं.स) माझी कन्या भाग्यश्री या योजनेला मिळणारा अपुरा प्रतिसाद लक्षात घेता राज्य शासनाने ऑक्टोबर २०२३ पासून योजनेत बदल करत ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू केली होती. मात्र, या योजनेतील निकषानुसार अद्याप पुणे जिल्ह्यातून एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळू शकली नसल्याचे समोर आले आहे. बदललेल्या निकषानुसार पुन्हा एकदा ही योजना जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी ता. एक ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली होती. मात्र, सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, या योजनेमध्ये बदल करण्यात आले. त्यानुषंगाने सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली. एक एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करावी लागते. त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो. मात्र, सध्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असल्याने अंगणवाडी पर्यवेक्षिका या योजनेचे प्रस्ताव नोंदवून घेत आहेत. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येते.
हिंदुस्थान समाचार
