नाशिक, ११ डिसेंबर (हिं.स.) – नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही उबाठा गटाला देण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी ही जागा ठाकरे गटाला सोडण्यासाठी मान्यता दिली आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते सुनील बागुल यांनी दिली.
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये पहिल्यापासूनच संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे ही जागा महाविकास आघाडीमधून कोण लढविणार, यासाठी वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. भाजपच्या एका आमदाराने ही जागा भाजपाच लढविणार असल्याचा दावा केला होता, परंतु शिंदे गटाकडून ही जागा शिंदे गटाला मिळावी, यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे प्रयत्नशील होते. याबाबत त्यांना आश्वासन देखील देण्यात आले, मग महाविकास आघाडीकडून ही जागा कोण लढविणार, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते.
या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह अन्य काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना ठाकरे गटाने निवडणूक लढविल्यास कसा फायदा होऊ शकतो, याबाबत समजून सांगितले. त्यावेळी शरद पवार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही ठाकरे लढविण्यास मान्यता दिली असल्याचे सुनील बागुल यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार
