नागपूर, 12 डिसेंबर (हिं.स.) : राज्यातील तरुणांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली. मी जळगावपासून शेतकरी दिंडी काढली होती. नागपूरच्या अधिवेशनात दिंडी नेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. रोहित पवारांनी त्याहीपेक्षा मोठी यात्रा काढली. ही दिंडी नव्या पीढीची आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर सत्ता टिकणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. झिरोमाईल येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
या सभेमध्ये आ. रोहित पवार यांच्या 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोपही करण्यात आला. या सभेला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग, उबाठा गटाचे खा. संजय राउत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, खासदार अमोल कोल्हे, समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांच्यासह महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातील सर्व मित्र पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. युवा संघर्ष यात्रा ही तरुणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी आहे. ही नव्या पिढीची दिंडी आहे. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. मीही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी एक यात्रा काढली होती. यात्रा इतिहास घडवित असतात. आमची यात्रा शेतमालाल व कापसाला भाव मिळावा यासाठी होती. सामंजस्य आणि सहकार्याने सरकार ऐकायला तयार नसल्यास युवा शक्ती आपली ताकद दाखवून देईल असे ते म्हणाले.
फक्त सत्तेसाठी काम करणाऱ्यांना आम्ही भीक मागीत नाही. कोणत्याही पिकाला भाव मिळतो तेव्हा आयात वा निर्यात बंदी केली जाते. ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याकडून कापुस विकत घेऊन देशातंर्गत कापसाचे भाव पाडले असा आरोप रोहित पवार यांनी केला. लोकांना समजून घेण्यासाठी व त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संघर्ष यात्रा काढली असे ते म्हणाले. यावेळी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. युवा शक्ती ठामपणे उभी राहिली तर सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहाणार नाही असा विश्वास चव्हाण यांनी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत जिंकण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व उमेदवारांना ताकद द्या असे आवाहन केले.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी ही पळपुट्यांची नव्हे तर लढणाऱ्यांची व संघर्ष करणाऱ्यांची आहे असे सांगितले. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आणू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.दुदैवाने मध्य प्रदेशची हवा आम्हाला कळली नाही. पण मध्य प्रदेशची हवा महाराष्ट्राला लागणार नाही. आगामी 2024 मोदी सत्तेवर येणार नाही ही गॅरण्टी आहे. राज्य सरकारमध्ये एक फुल आणि दोन डाऊटफुल आहे असा टोला राऊत यांनी हाणला. यापुढील वाटचाल सावधपणे करायची आहे. दिग्विजयसिंग यांनी मोदींची गॅरंटी रोज बदलत असते अशी टीका केली. भाजपा आणि रा. स्व. संघ देशात विद्वेषाचे वातावरण पसरवित असल्याचा आरोप केला. रोहित पवार यांनी संपर्क आणि संवाद कायम ठेवावा.
हिंदुस्थान समाचार
