डोंबिवली, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। एमआयडीसी निवासी विभागात गेले काही दिवस तीव्र पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही इमारतीना गेले आठवडाभर पाण्याचा एकही थेंब आला नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी एमआयडीसी कार्यालयावर रोज जाऊन जाब विचारणे सुरू केले आहे. एमआयडीसीचे अधिकारी त्यांना थातूरमाथुर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत. परिणामी लोकांची सहनशीलता संपल्याचे दिसत असून घरात पाणी नसल्याने गुरुवारी दुपारी एक ज्येष्ठ नागरिक काशिनाथ सोनावणे, (वय 76 वर्षे), राहणार जय गुरुदेव सोसायटी RH-63 हे त्यांना नीट चालता येत नसतानाही वॉकरचा आधार घेऊन त्यांचा राहत्या इमारीतीचा गच्चीवर जाऊन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्नात होते. परंतु त्याला काही लोकांनी समजावून आत्महत्या कारण्यापासून परावृत्त केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्याच सोसायटी मध्ये राहणारे अनिल शिंदे याने त्वरित हालचाल करून इमारतीचा गच्चीवर जाऊन काशिनाथ सोनावणे यांना समजावून घरी आणून सोडले.
अनेक नागरिक सोनावणे यांच्यासारखे त्रस्त झाले असुन अशा घटना जर झाल्या तर याची जबाबदारी कोण घेणार आहे. निवासी मधील दुसरे एक ज्येष्ठ नागरिक आणि वकील मुकुंद वैद्य यांनी आणि असंख्य रहिवाशांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि एमआयडीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांना इमेल करून निवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
या विषयावर शुक्रवारी स्थानिक आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली निवासी भागातील काही महिला, पुरुष नागरिक आणि ग्रामीण परिसरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचाराण्यासाठी गेले होते. एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बी. बी. हर्षे यांच्या दालनात मिटिंग होऊन पाण्यासाठी त्वरित उपाययोजना करून आजपासूनच लोकांना पाणी आले पाहिजे असे आमदार मोरे यानी एमआयडीसी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
यावेळी उपस्थित जनता व पदाधिकारी यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून धारेवर धरले. एमआयडीसी आमचे पाणी हे मोठ्या बिल्डरांच्या निवासी संकुलकडे फिरवीत असणार असा गंभीर आरोप सर्वांनी केला.
त्यावेळी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, कल्याण शीळ रोडवरील सोनारपाडा जवळ निवासीकडे जाणारी पाण्याची पाईपलाईन व्हॉल्व वरील चावी कोणीतरी अज्ञात व्यक्ती येऊन पाणी पुरवठा बंद करीत असल्याचे सीसी कॅमेऱ्यातून दिसल्याचे सांगितले. त्याबद्दल आम्ही पोलीस तक्रार करून अधिक माहिती मिळवीत आहोत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे आता आमदार राजेश मोरे हे यासंदर्भात येत्या गुरुवारी 13 ऑक्टोबर रोजी पुन्हा आढावा मिटिंग घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या प्रयत्नात आहेत.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi
