ठाणे, 30 ऑगस्ट (हिं.स.)। झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) इमारतीच्या बांधकामामुळे सुमारे दीड वर्षांपासून बंद झालेली ५० ते ६० वर्षांपूर्वीची पायवाट पुन्हा सुरू झाल्याने कोपरीकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला. या निर्णयाबद्दल कोपरीतील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला.
कोपरीतील धोबीघाट येथील श्रमसाफल्य सोसायटीजवळचा रस्ता दीड वर्षांपूर्वी एसआरए इमारतीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. या कामासाठी सहा महिन्यांची मुदत बिल्डरने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात संथ गतीने एसआरए प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे ग्रामस्थांची पायवाट बंद झाली होती. त्यामुळे त्यांना वळसा घालून जावे लागत होते. शांतीनगर, आनंदनगर, सिद्धार्थनगर, धोबीघाट परिसरातील हजारो नागरिकांना त्याचा फटका बसत होते. विशेषत: याच पायवाटेवरून नागरिकांचा शाळा, मार्केट, मंदिर आणि शेठ लखमीचंद फतीचंद हॉस्पिटलकडे जाण्याचा रस्ता होता. ही पायवाट पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी महिलांनी दिवसभर धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर या प्रश्नावर भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून एसआरए विभागातील अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधला. अखेर या विषयावर काही दिवसांपूर्वी एसआरएचे अधिकारी व संबंधित बिल्डरची बैठक झाली. त्यानंतर संबंधित बिल्डरने पुन्हा पायवाट सुरू करण्याची ग्वाही दिली.
दुसरी पायवाट खुली
यापूर्वी कोपरी गावातून बाजारपेठेत येण्यासाठी नागरिकांची वर्षानुवर्षे असलेली पायवाट पुन्हा खुली करण्यात आली. माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांना यश आले होते. यापूर्वी २०२२ मध्ये कोपरीतील आदित्य प्लाझा सोसायटीलगतची पायवाट बंद झाली होती. मात्र, भरत चव्हाण यांनी सोसायटीतील विधाते, रेश्मा अहिरे, शेंडगे यांच्यासह सर्व सदस्य आणि कोपरीतील रहिवाशांची एकत्रित भेट घेऊन तोडगा काढला होता. त्यानंतर ही पायवाट खुली झाली होती.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने
