सोलापूर, 6 ऑक्टोबर, ( हिं.स) सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात चंद्रकांतदादा पाटील हे पाचवे पालकमंत्री झाले आहेत. जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची मांदियाळी असताना मंत्रीमंडळाचा विस्तार नसल्याने स्थानिक नेतृत्वावर अविश्वासाचे सावट आले आहे. भाजपने अभ्यासू, जाणकार व्यक्तिमत्व म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व दिले होते. अशा जाणकार नेत्यालाही स्थानिक नेत्यांच्या नाराजीच्या कुरघोडीत जिल्ह्याची जबाबदारी पेलता आली नाही. जे विखे-पाटलांना पेललं नाही, ते चंद्रकांत पाटलांना जमेल का? हे आगामी काळच ठरविणार आहे.पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी आमदार सुभाष देशमुख यांचे सख्य वाढले. तर दुसरे आमदार विजयकुमार देशमुख मात्र दूर गेले. पहिल्या सोलापूर दौऱ्यात दोन देशमुखांमधील गटबाजी विखे-पाटलांनी जवळून पाहिली.परंतु ते कसलेले नेतृत्व असल्याने दोन देशमुखांना त्यांनी सरळ बाजूला केले. अन् तरुण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हातात जिल्ह्याची सुत्रे देऊन विकास साधू शकतो, असा विश्वास दाखविला. महादिग्गज नेत्यांच्या गर्दीत जिल्ह्याचा विकास साधणे अवघड बनले. राजकारणातील अनेक डाव पेलले असतील पण सोलापूरच्या पालकत्वाची जबाबदारी मात्र त्यांना जड गेली.
हिंदुस्थान समाचार
