चंद्रपूर 21 नोव्हेंबर (हिं.स.) – जिल्ह्यातील संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिमेची होणार अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील 18 लक्ष 34 हजार 245 लोकांची तपासणी 1 हजार 513 चमूमार्फत 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करून अभियानास सहकार्य करावे. लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी. निदान झाल्यास क्षयरोगावर संपूर्ण औषधोपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
क्षयरोगाची लक्षणे :
दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला व ताप, वजनामध्ये लक्षणीय घट, मानेवर गाठ, थुंकीद्वारे रक्त जाणे, सायंकाळी ताप येणे व रात्रीला हातापायाला घाम येणे ही क्षयरोगाची लक्षणे आहे. संपूर्ण औषधोपचार केल्यावरच या रोगाचा संसर्ग कमी होऊ शकतो व रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
निक्षय मित्र बनून मदत करण्याचे आवाहन :
क्षयरुग्ण औषधोपचार घेत असतांना त्यास योग्य तो पुरक पोषण आहार मिळावा, तो क्षयमुक्त व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था अथवा दानशूर व्यक्तीने एका क्षयरुग्णास दर महिन्याला एक याप्रमाणे 6 महिन्याकरीता फुड बास्केट (न्युट्रीशन किट) देवून निक्षय मित्र बनून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फुड बास्केटमध्ये तांदूळ- गहू 3 किलो, तूरडाळ दीड किलो, शेंगदाणे 1 किलो खाण्याचे तेल 1 लिटर, याव्यतिरिक्त ऐच्छिकरीत्या चणाडाळ, मुगडाळ, मोट, मसूर, बरबटी, राजमा, सोयाबीन वडी, शेंगदाणा व राजगिरा चिक्की, खजूर व कणिक आदी साहित्य देऊन क्षयरुग्णास सहाय्य करू शकता.
हिंदुस्थान समाचार
