ठाणे, 29 डिसेंबर (हिं.स.) : तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कोपरी आयडल सिझन २ सिंगिंग स्पर्धेत समीर कुलकर्णी यांनी विजेतेपद पटकाविले आहे. सुमारे ४० स्पर्धकांमधून समीर यांनी गायलेले `जिंदगी एक सफर’ गीत अव्वल ठरले. या स्पर्धेत दीपा गैंद यांनी द्वीतीय, तर सचिन निताळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून कोपरी येथे सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. या महायज्ञानिमित्ताने कोपरी परिसरातील होतकरू गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कोपरी आयडल सिझन २ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेवेळी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच या उपक्रमाचे कौतुक केले.
कोपरी आयडल स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते. या स्पर्धेसाठी नोंदणी झालेल्या ५० पैकी ४० स्पर्धकांची निवड झाली. जुनी-नवी हिंदी व मराठी चित्रपट गीते, मराठी भावगीते व लावणी सादर करीत गायकांनी गाणी सादर केली. या कार्यक्रमात विशेष पाहुणे हेमंत आयरे, पोलिस निरीक्षक वानखेडे यांनी सादर केलेल्या गाण्यांना रसिकांची पसंती मिळाली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी समीर कुलकर्णी यांनी जिंकली. तर दीपा गैंद यांना द्वीतीय, सचिन निताळे यांना तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली. जगन्नाथ केदार व विजय पवार यांना उत्तेजनार्थ ट्रॉफीने गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पंडित चारुदत्त संगीत, गायिका मोहना जोशी आणि गायक उमेश सुतार यांनी काम पाहिले. तर या स्पर्धेचे संगीत व्यवस्थेसह संपूर्ण संयोजन अशोक जग्याशी, दीपक पुरस्वानी आणि अनिल जाधव यांनी केले होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन आर जे सोनाली यांनी केले.
हिंदुस्थान समाचार
