मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.) : माझे परममित्र आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालोय. लोकांत रमणारा खरा लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारा दिलखुलास निष्ठावान नेता भाजपाने गमावला आहे, अश्या शब्दांत राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
शोक संदेशात मुनगंटीवार म्हणाले कि, अकोलेकरांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, सदैव मदतीचा हात देणारे व सामान्यांमध्ये ‘लालाजी’ नावाने प्रसिद्ध अकोला पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाची वार्ता मनाला वेदना देणारी आहे.
पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. श्रीराम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९८५ मध्ये झालेल्या शीलापूजनातही ते सहभागी झाले होते. असंख्य भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो व त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अश्या भावना व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हिंदुस्थान समाचार
