मुंबई, 27 फेब्रुवारी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना दिनांक २६ फेब्रुवारी रोजी उद्भवली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरिय जलाशय, ट्रॉम्बे उच्चस्तरिय जलाशय, घाटकोपर निम्नस्तरिय जलाशय तसेच शहर विभागातील एफ दक्षिण, एफ उत्तर विभाग, गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा ३० टक्क्यांनी कपात करण्यात येत आहे. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
१०० टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग: टी विभाग (पूर्व आणि पश्चिम), एस विभाग (नाहूर पूर्व, भांडुप पूर्व, विक्रोळी पूर्व), एन विभाग (विक्रोळी पूर्व, घाटकोपर पूर्व, सर्वोदय नगर, नारायण नगर), एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभाग, एफ दक्षिण व एफ उत्तर संपूर्ण विभाग, भंडारवाडा जलाशयातून पाणीपुरवठा होणारा ई, बी आणि ए विभाग.
३० टक्के पाणीपुरवठा बंद असलेला भाग: वर उल्लेख केलेल्या विभागाव्यतिरिक्त उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभाग.
