डोंबिवली, १९ फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या कामात शिक्षकांना जुंपू नये अशी मागणी केलीय. कायद्याचे अभ्यासक ऍड.असीम सरोदे यांनी राज ठाकरेंच्या मागणीचे समर्थन केले आहे. निवडणुकीच्या कामासाठी पदवीधर तरुणांना प्रशिक्षण देऊन तात्पुरती नेमणूक करावी असे सरोदे म्हणाले.
डोंबिवलीतील इंडिया आघाडीकडून शिवजयंती निमित्त बाल भवन येथे ठेवलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ऍड. असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सरोदे म्हणाले की, निवडणूक आयोगाने एक वेगळी टीम तयार करायला हवी होती. आयोगानेच एक नोटिफिकेशन काढले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे शिक्षकांचा आणि लहान मुलांचा वापर निवडणुकीच्या कामासाठी करू नये. या पार्श्वभूमीवर त्यांचाही गैरवापर होऊ नये यासाठी स्वायत्त तीन निवडणूक आयोगाने तयार करणे गरजेचे होते. तिच्या कामासाठी पदवीधर असलेल्या लोकांना प्रशिक्षण देऊन तात्पुरता कामकाजासाठी त्यांना घेण्यात आले पाहिजे. कुणाला तरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण पगार मिळेल असे सरोदे यांनी सांगितले.
