रत्नागिरी,संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नजीकच्या आंबव येथे काल (दि. २७ मार्च) गणपत दौलत जोशी यांचे आंबा-काजू बागेमध्ये असलेल्या विहिरीत बिबट्या मृतावस्थेत सापडला.
गावचे पोलीस पाटील प्रकाश पांचाळ, यांनी दूरध्वनीद्वारे ही माहिती वन विभागाला दिली. ती मिळतात वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकामधील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता विहिरीमध्ये बिबट्या मृतावस्थेत असल्याचे दिसून आले.
ही विहीर १० फूट व्यास, ३ फूट कठडा असलेली, २५ फूट खोल असून ती जांभ्या दगडाने बांधकाम केलेली आहे. या विहिरीमध्ये ग्रामस्थांच्या मदतीने लाकडी शिडी सोडल्यानंतर खाली उतरून दोरीचा फास टाकून बिबट्याला फासामध्ये अडकवून बाहेर घेण्यात आले. बिबट्याचा मृतदेह वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
