नाशिक, 16 ऑक्टोबर : पुण्यानंतर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकनगरीला ड्रग्ज माफियांच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे पितळ उघडे पाडण्यास शुक्रवार दि.20 ऑक्टोबर रोजी शिवसेना ठाकरे गटातर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात नाशिककरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी केले.
20 ऑक्टोबरच्या मोर्चाची रूपरेषा आखण्यासाठी शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवरांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना घोलप बोलत होते. व्यासपीठावर उपनेते अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते.
