धुळे,आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय राखून कामकाज करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केल्या.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, आगामी लोकसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी नियुक्त प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची सखोल माहिती घ्यावी. त्याप्रमाणे नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. वेळोवेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यावा. मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे. वृद्ध व दिव्यांग मतदार बांधवांना मतदान केंद्रावर आयोगाच्या सुचनेनुसार आवश्यक त्या सोयीसुविधांची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी दिव्यांग मतदारांची संख्या जास्त आहे. त्याठिकाणी व्हिलचेअर तसेच इतर सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. अशा ठिकाणी त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची मदत घ्यावी.
टपाल विभागाने निवडणूक आयोगामार्फत वितरीत केलेले ई-पीक मतदानकार्ड त्वरीत वितरीत करुन वितरणाचा अहवाल सादर करावा. आचारसंहिता घोषित झाल्याबरोबर आदर्श आचारसंहितेची त्वरीत अंमलबजावणी करावी. माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समिती, कंट्रोल रुम, आचारसंहिता कक्ष, कंट्रोलरुमची त्वरीत स्थापन करावे. शासकीय आवारातील पोस्टर, बॅनर, कोनशिला तसेच संकेतस्थळावरील राजकीय पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र त्वरीत काढुन टाकावेत. अतिदुर्गम भागात संपर्क होत नसलेल्या ठिकाणी संपर्कासाठी आवश्यक नियोजन करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जाणीव व जागृती कार्यक्रमाचे आयोजन करावेत, अशा सूचनाही गोयल यांनी यावेळी दिल्यात.
या बैठकीत मनुष्यबळ व्यवस्थापन, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा, मतदान केंद्रातील व्यवस्थापन, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, साधनसामग्री व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, निवडणूक दरम्यान वाहतूक व्यवस्था, निवडणूक प्रशिक्षण, मीडिया प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, हेल्पलाईन व तक्रारींचे निरसन साहित्य व्यवस्थापन, ईव्हीएम मॅनेजमेंट या विषयांबाबत सविस्तर आढावा घेतला.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक विषयक केलेल्या तयारीची माहिती दिली.
