मुंबई, – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांबाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे, असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असे म्हणत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जेव्हा काही जागांवर चर्चा सुरू आहे आणि आपण आघाडीत आहोत, तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
