सोलापूर 17 ऑक्टोबर ( हिं.स) : मध्य रेल्वे सोलापूर विभागातील रेल्वेंना थांबा देणे, मुंबई – सोलापूर वंदे भारत रेल्वेच्या वेळेत बदल करणे, अमृत भारत योजनेअंतर्गत अक्कलकोट रोड व मोहोळ रेल्वे स्थानकाचा समावेश करणे, सोलापूर – तुळजापूर – धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादन काम लवकर पूर्ण करणे, सांगोला – मंगळवेढा – सोलापूर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणे, दौंड ते कलबूर्गी लोकल शटल सेवा अथवा डेमू रेल्वे सुरू करणे, रेल्वेचा सोलापूर पर्यंत विस्तार करणे, पंढरपूर वाराणसी नवीन रेल्वेची सुरू करणे, यांसह विविध मागण्या खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मांडल्या.
पुणे येथे आयोजित केलेल्या सोलापूर, पुणे विभागातील संसद सदस्य समितीच्या अध्यक्षपदी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची एकमताने निवड केली. या समितीच्या बैठकीत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापूर विभागातील रेल्वेच्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या. यावेळी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश ललवाणी, सोलापूर आणि पुणे विभागातील लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी.आर.एम, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, वंदे भारत रेल्वे मुंबईहून सोलापूरकडे धावणार्या गाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. ४ वाजता सुटणारी वंदे भारत मुंबई हून ६ वाजता सोडावी जेणेकरून मुंबईतील कामकाज संपवून पुणे, सोलापूरकडे येणे अधिक सुविधेचा होईल अशी मागणी केली . अमृत भारत योजनेत सोलापूर, दुधनी, कुर्डुवाडी रेल्वे स्थानकांचा समावेश यापूर्वी करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
