ठाणे, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे ठाण्यात ७ व ८ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ७ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. त्याचबरोबर अन्य विजेत्यांनाही रोख रकमेची बक्षीसे दिली जाणार आहेत.
ठाणे शहरात होणाऱ्या या स्पर्धेचे यंदा द्वितीय वर्ष असून, गेल्या वर्षाप्रमाणेच स्पर्धा दर्जेदार होण्याची अपेक्षा आहे. मराठी भाषेतून होणाऱ्या स्पर्धेसाठी वरिष्ठ गटासाठी युवकांनी राजकारणात यायला हवं, स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी जातीय आरक्षणाची गरज आहे? लैंगिकतेपलीकडची मैत्री, महाराष्ट्रातील राजकारणाची गणितं आणि भविष्य, बाईपण भारी देवा आणि पुरुष? राजकारणातील प्रभावी नेतृत्व तर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असा घडवूया महाराष्ट्र! छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास, त्यावरचे चित्रपट आणि आपण… स्त्री-पुरुष समानता-नेमकी कशी हवी? दिल्लीतील प्रदूषण आपल्याला आरसा दाखवतंय का? भारताची क्रिकेट वगळता इतर खेळामधली प्रगती, जुनं ते सोनं, नवं ते हवं आदी विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांच्या विजेत्याला ७ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमाकांला ५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला ३ हजार रुपये व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून एक हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून, सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. संपर्क : ९००४९१२४६८, ९१६७२४६८३३, ९९३०५३८२०४
हिंदुस्थान समाचार
