नाशिक, २३ जानेवारी (हिं.स.) : काहीजण आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा वापर करून त्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण असा प्रयत्न चुकूनही करू नका आम्ही तो कदापि यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे गटावरती देखील कडाडून टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अधिवेशन नाशिक मध्ये डेमोक्रसी येथे संपन्न झाले. या अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, श्रीरामाला हायजॅक करण्याचा प्रयत्न करु नका, तो कोणत्याही एका पक्षाचा नाही. पण तुम्ही जर तसं करत असाल तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. ठाकरे म्हणाले, आज रामाचे मुखवटे घालून जे काही रावण फिरत आहेत, त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. काल तिकडे सर्व अंधभक्त जमले होते त्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांची बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी. पण तिथं कोणीतरी एकानं म्हटलं की, आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान. अजिबात नाही, त्रिवार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज राम मंदिर उभं राहुच शकलं नसतं. कारण आज तुम्ही तिकडं जे काही जाऊन बसलात ते केवळ तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणूनच. अन्यथा हे कोणाही येऱ्यागबाळ्याचं काम नाही. म्हणूनच मी आज ठरवलंय की या मातीत ते तेज जन्माला आलं आहे. आज मोदी अयोध्येला गेलेत त्याआधी पंतप्रधान झाल्यानंतर कधी गेले नव्हते, त्यापूर्वी गेले असतील. पण मी शिवजन्मभूमीची माती घेऊन रामजन्मभूमीला गेलो होतो. मी २०१८ मध्ये नोव्हेंबरमध्ये गेलो होतो. तेव्हा थंड बस्त्यात पडलेला हा विषय होता तो अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत सुप्रीम कोर्टानं निकाल दिला कारण हा मी अयोध्येला नेलेल्या मातीचा महिमा आहे.
यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की ज्या पद्धतीप्रमाणे श्रीरामाचे मार्केटिंग करून आपणच सर्व असल्याचे जे दाखविण्यात येत आहे ते चुकीचे आहे अशा पक्षांना आणि त्याची भांडवल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली गेली पाहिजे तर या वेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की भाजपाचे राम हे एकवचनी नाही कारण त्यांनी ज्यांच्या वरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले आहेत आणि त्यामुळे ते किती एकवचनी आहेत तिची निष्ठावंत आहेत हे यातूनच समोर येत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
हिंदुस्थान समाचार
