मुंबई, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २१ एप्रिल २०२४ रोजी मतदान आणि २४ एप्रिल २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच यासाठी नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. या संदर्भात विद्यापिठाने अधिसूचना जारी केली आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे राजकीय पक्षांसह विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजी होती.
असे आहे वेळापत्रक
सिनेट निवडणुकांचे सुधारित वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत नव्याने मतदार नोंदणी, १ डिसेंबर २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी, २९ फेब्रुवारी २०२४ निवडणूक अधिसूचना जाहीर, ११ मार्च २०२४ रोजी उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक, १८ मार्च २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची दिनांक, २० मार्च २०२४ रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध, २१ एप्रिल २०२४ रोजी सिनेट निवडणूक आणि २४ एप्रिल २०२४ निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.
नव्याने मतदार नोंदणी सुरू होत आहे. दरम्यान याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेल्यांना पुन्हा मतदार नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाही. याआधी जर मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी या लॉगिन आयडीद्वारे अर्ज केले असतील, त्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करता येणार आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
