मुंबई, २१ नोव्हेंबर, (हिं.स)- महाराष्ट्र विधानभवनात मुंबई महानगरपरिसरात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे मंजूर करण्यात आलेले रुग्णालय कार्यन्वित करण्याबाबत मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दिनांक ३१ जानेवारी, २०१२ च्या शासननिर्णयान्वये अलिबाग (जि.रायगड), नंदुरबार, सातारा व मुंबई महानगर परीसर येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्याबाबत मंजूरी देण्यात आली होती. तथापि सदर शासननिर्णयानुसार अलिबाग (जि.रायगड), नंदुरबार व सातारा या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली परंतू मुंबई महानगरपरिसरामध्ये जागेअभावी सदरचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये कार्यान्वित झाले नव्हते. त्यामुळे सदर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी जी.टी.रुग्णालयातील वैद्यकीय विभागासाठी राखीव असलेल्या इमारतीमध्ये शासनाचे अन्य विभागाची कार्यालये असल्यामुळे वैद्यकीय कारणासाठी वापरात येत नव्हती. त्यामुळे सदरच्या इमारतीमधील इतर शासकीय कार्यालयांना अन्य पर्यायी ठिकाणी स्थलांतरीत करुन वैद्यकीय महाविद्यालयासाठी इमारत उपलब्ध करुन देण्याबाबत देखील सामान्य प्रशासन विभागाला मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत निर्देश दिले. यामुळे आता यासंदर्भातील कामाला चालना मिळणार असून रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचारसेवा उपलब्ध होईल.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा.ॲड. राहुलजी नार्वेकर यांनी प्रधान सचिव, वैद्यकिय शिक्षण, आयुक्त, वैद्यकिय शिक्षण व सर्व संबंधित अधिकारी यांना यासंदर्भातील पुढील आवश्यक ती प्रशासकिय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
हिंदुस्थान समाचार
