मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.) : मध्य रेल्वेने वाणिज्यिक महसूलात सातत्याने आपली सर्वोत्तम कामगिरी देण्याची गती कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षात, म्हणजे २०२३-२४ (डिसेंबर-२०२३ पर्यंत), मध्य रेल्वेने रु. १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळवला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील याच कालावधीतील रु. ११,५७४.५१ कोटी उत्पन्नाच्या तुलनेत १४.३०% वाढ झालेली आहे.
यामध्ये :
• आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवासी महसूलातून मिळालेल्या रु. ५,४००.३९ कोटींच्या उत्पन्नात १५.८३% ची वाढ दर्शवत आहे.
• आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १०७२ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवास करणार्या प्रवाशांची (उपनगरीय आणि गैर-उपनगरी) संख्या ११७४ दशलक्ष होती ज्यात ९.५% वाढ झाली आहे.
• आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये माल वाहतूकी पासून मिळणारे उत्पन्न रु.६,८१८.५३ कोटी होते, जे आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या संबंधित कालावधीतील रु.६,००२.७६ कोटी उत्पन्नापेक्षा १३.५९%ने जास्त आहे.
• पार्सल आणि सामान, तिकीट तपासणी, भाडे व्यतिरिक्त महसूल (NFR), वाहनतळ, खानपान, पैसे भरा आणि वापरा, विश्रांती गृह इत्यादींमधून मिळणाऱ्या उत्पन्नासह, कोचिंग व इतर उत्पन्न २०२३-२४ या आर्थिक वर्षात १०१०.५८ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच कालावधीत प्राप्त झालेल्या रु.९०९.४० कोटी उत्पन्नाच्या तुलनेत यंदा ११.१२% ची वाढ झालेली आहे.
डिसेंबर-२०२३ महिन्यात:
• मध्य रेल्वेने मागील रु.१४८५.४८ कोटींच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा रु.१६७१.३८ कोटी प्रवासी महसूल मिळवला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२.५१% अधिक आहे. डिसेंबर-२०२३ मध्ये प्रवासी संख्या (उपनगरीय व गैर-उपनगरी) १३४ दशलक्ष इतकी झाली, जी डिसेंबर २०२२ मध्ये १३१ दशलक्ष होती.
• डिसेंबर-२०२३ मध्ये मालवाहतूकी पासून मिळणारे उत्पन्न रु. ८५४.०४ कोटी होते जे डिसेंबर २०२२ मध्ये रु. ७९५.४४ कोटी होते, यात ७.३७% वाढ झालेली आहे.
• डिसेंबर-२०२३ मध्ये कोचिंग आणि इतर उत्पन्न रु. ११६.०५ कोटी होते. डिसेंबर-२०२२ मधील १०५.३१ कोटीच्या या उत्पन्नात १०.१९% वाढ झालेली आहे.
महसुलात वाढ होण्याचे श्रेय हे मध्य रेल्वेचे विविध उपक्रम जसे की विभागांवर व्यवसाय विकास केंद्रांची (BDUs) स्थापना तसेच, गहन विपणनासाठी इतर भाडे व्यतिरिक्त महसूलाचे उपक्रम आणि उत्पन्नास चालना देण्यासाठी इतर नाविन्यपूर्ण कल्पनांचे आहे.
हिंदुस्थान समाचार
