पुणे 5 नोव्हेंबर (हिं.स) दिवाळीच्या खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, मंडई परिसरात झुंबड उडाली. गर्दीमुळे बाजीराव रस्ता, शनिपार, मंडई, तसेच शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी अनेकजण मोटारीतून आले होते. खरेदीसाठी गर्दी झाल्याने मध्य भागातील गल्ली-बोळातील वाहतूक विस्कळीत झाली होती.दिवाळीचा प्रारंभ (रमा एकादशी आणि वसुबारस – ९ नोव्हेंबर) होत आहे. रविवारी (१२ नोव्हेंबर) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. नरक चतुर्दशीला नवीन कपडे परिधान करण्याची प्रथा असल्याने लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, फडके हौद परिसरातील वस्त्र दालनात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. मध्य भागातील सर्वच रस्त्यांवर खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात सजावट साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. बोहरी आळीतील रस्ते अरुंद असल्याने या भागातून चालणे देखील अवघड झाले होते.
हिंदुस्थान समाचार
