पुणे, 17 ऑक्टोबर, (हिं.स) पाटबंधारे विभागाने महापालिकेला २०२३-२४ या वर्षासाठी केवळ १२.८२ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. हा पाणी कोटा लोकसंख्येचा विचार करता अपुरा असल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी प्रशासनातर्फे केली जाणार आहे.
महापालिकेने जुलै २०२३ ते जून २०२४ या वर्षासाठी २०.९० टीएमसी पाण्याची मागणी करणारे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाला सादर केले होते. यामध्ये निवासी आणि ये जा करणारी अशी एकूण ७२ लाख लोकसंख्या गृहीत, ३५ टक्के गळती धरून पाण्याची मागणी केली होती. पण पाटबंधारे विभागाने महापालिकेचे दावे फेटाळून लावला.यामध्ये २३ गावे व १६ संस्थांना महापालिका नाही तर पाटबंधारे विभाग पाणी पुरवठा करतो, पाणी गळती केवळ १३ टक्के आहे त्यामुळे त्यासाठी वाढीव पाणी कोटा देण्यास नकार देत १२.८२ टीएमसी पाणी मंजूर केले आहे.
हिंदुस्थान समाचार
