पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.) तळवडे एमआयडीसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात आगीमध्ये जखमी झालेल्या दहा रुग्णांना ससून रुग्णालयात सायंकाळी दाखल करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली.
ससून रुग्णालयात शिल्पा राठोड (वय ३१), प्रतीक्षा तोरणे (वय १६), अपेक्षा तोरणे (वय २६), कविता राठोड (वय ४५), रेणुका ताथोड, (वय २०), शरद सुतार (वय ४५), कोमल चौरे (वय २५), सुमन (४०), उषा पाडवे (४०) आणि प्रियंका यादव (३२) असे १० रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या कविता राठोड आणि शिल्पा राठोड या मायलेकी दोघीही कारखान्यात कामाला होत्या.तळवडे येथील कारखान्यात बहुतांश महिला कामगार होत्या. गंभीर जखमी झालेल्या रुग्णांपैकी नऊ महिला आणि एक पुरुष आहे. जखमींपैकी पाच रुग्ण ८० टक्के भाजले असून उर्वरित पाच जण ३० ते ६० टक्के भाजले आहेत. कारखान्यात लागलेल्या आगीचा धूर नाका-तोंडात गेल्यामुळे रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. जखमींपैकी चार जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती ससून रुग्णालयातील सहायक प्राध्यापक डॉ. निखिल पानसे यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
