परभणी, 31 ऑगस्ट, (हिं.स.)।जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी आज पुयनी–पालम रस्त्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सततच्या मुसळधार पावसामुळे पर्यायी वळण रस्ता वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पर्यायी वळण रस्ता सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित हाती घेण्याचे निर्देशही दिले.
यावेळी प्रशासनाकडून प्रभावित भागातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis
