अमरावती, 3 सप्टेंबर (हिं.स.) : अतिसंवेदनशील ठरवण्यात आलेल्या परतवाडा-अचलपूर या जुळव्या शहरांतील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद व काही वाकलेले असल्याचे समोर आले आहे. धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही निष्काळजीपणा शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे.नगरपरिषद व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने बसविण्यात आलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेसाठी अत्यावश्यक मानले जातात. मात्र, सध्या ते निष्क्रिय असल्यामुळे गुन्हेगारी घटनांना आळा बसण्याऐवजी मोकळं रान मिळतंय, अशी नागरिकांची भावना आहे. विदर्भ मिल परिसरात चोरट्यांनी नुकतीच केलेली धडक चोरी, तसेच सदर बाजारातील दागिन्यांच्या दुकानात पडलेला दरोडा हे प्रकार सीसीटीव्ही बंद असण्याच्या गंभीर परिणामाचे उदाहरण आहेत. नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले असून, त्याचा मानसिक धसकाही मोठा आहे. येत्या काही दिवसांत ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्थी यांसारखे मोठे धार्मिक उत्सव असून, अशा काळात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करते.शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून सुरक्षेच्या यंत्रणा सक्रिय करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा, वाढत्या गुन्हेगारीमुळे रस्त्यांवर उतरून आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया: कॅमेरे लावले पण ते बंद असतील तर फायदा काय? अशा निष्क्रिय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहणार नाही, असे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
