नांदेड, 21 जानेवारी (हिं.स.) – जिल्ह्यात वाळू माफीयांची गुंडगिरी वाढत असून ही दहशत मोडीत काढली पाहिजे, तसेच ज्या ज्या भागात अवैध वाळूचा गोरखधंदा सुरू आहे तेथील तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केल्याने वाळू माफीयांना संरक्षण देणाऱ्या तहसीलदार आणि पोलीस ठाणेदारांचे धाबे दाणाणले आहे. नांदेड शहरात शासकीय विश्रामगृहात खा. अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वाळू माफीयांची गुंडगिरी मोडीत काढण्याची विनंती जिल्हा प्रशासनास केली.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात वाळू उपसा जोमात सुरु आहे. लोह्या सहित मुदखेड तालुक्याच्याही गोदावरीच्या विविध घाटातून वारेमाप वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. जिल्ह्यात हायवाच्या धडकेत विविध अपघातात पाच नागरिकांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात वाळू उपशाला बंदी असताना शंखतीर्थ, खुजडा, वासरी, महाटी येथे वाळू उपसा सुरूच असतो. हीच परिस्थिती नायगाव, उमरी व लोहा तालुक्यात असून वारेमाप वाळू उपशाने गोदावरी नदीचे आरोग्य अडचणीत सापडले आहे. तेव्हा खा. अशोक चव्हाण यांच्या सुचनेनंतर तरी जिल्ह्यातील नायगाव, मुदखेड, उमरी आणि लोहा तालुक्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या जाणार काय हे पाहावे लागेल.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
