ठाणे, ७ ऑक्टोबर, (हिं. स) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी नागरिक जागरूकता अत्यंत महत्वाची असल्याने केंद्र शासनाने जनमनरेगा मोबाईल अॅप निर्मित करून योजनेत पारदर्शकता आणि सुशासनाच्या संकल्पनेला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत नागरिकांचा सकारात्मक दृष्टीकोन वाढवून नागरिकांना जनमनरेगा मोबाईल अॅपच्या माध्यमातून योजनेत सहभागाची होण्याची संधी मिळते. या अॅपच्या माध्यमातून नागरीक त्यांच्या परिसरात किंवा त्यांच्या वर्तमान स्थानापासून (Current Location) ५ हजार मीटर क्षेत्रात मनरेगांतर्गत झालेल्या कामांची माहिती मिळवू शकतात. तसेच Geo Tagging झालेल्या कामांना मॅपच्या सहाय्याने भेट देऊन झालेल्या कामांविषयी आपले अभिप्राय (Feedback) देऊ शकतात. याप्रमाणे जनमनरेगा हे जमिनीच्या पातळीवरील माहितीच्या प्रवाहाचे साधन असल्याने नागरिकांना प्रणालीशी जोडेल.
जनमनरेगा हे सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी व सुशासनाच्या दिशेने एक उपक्रम आहे. हे अॅप लोकप्रिय करण्यासाठी याचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असल्याने मनरेगा योजनेशी संबंधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अॅपचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जास्तीत जास्त व्यक्तींनी या अॅपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत स्तरावर जास्तीत जास्त व्यक्तींनी जनमनरेगा मोबाईल अॅपवर नोंदणी करून वापर करण्याबाबत संबंधीतांना सूचना देण्यात याव्यात, असे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र नागपूर आयुक्त अजय गुल्हाने (भा.प्र.से) यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार
