छत्रपती संभाजीनगर, 23 फेब्रुवारी (हिं.स.) :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘डिपेक्स-२०२६’ या प्रदर्शन व स्पर्धेच्या भूमिपूजन समारंभाचा कार्यक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच आमदार अतुल सावे आणि बांधकाम व्यावसायिक राजेंद्रसिंह जबिंदा यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी सृजनचे सचिव डॉ. भरत अमळकर, उद्योजक राम भोगले, संचालक मुनिश शर्मा, अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश मुंढे तसेच प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रांतील नवकल्पनांचे सादरीकरण
‘डिपेक्स-२०२६’ मध्ये राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, कृषी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेली वर्किंग मॉडेल्स सादर केली जाणार आहेत. कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण व सायबर सुरक्षा, ऊर्जा, औद्योगिक स्वयंचलन, वैद्यकीय तंत्रज्ञान, मोबिलिटी, शाश्वत नागरी पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा विविध विषयांवरील प्रकल्पांचे सादरीकरण या प्रदर्शनात होणार आहे.
हे प्रदर्शन ५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान एमआयटी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले असून यावर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. राज्यभरातील महाविद्यालये, विद्यापीठे, उद्योजक, संशोधक, इनक्युबेशन सेंटर आणि धोरणनिर्माते या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
विकसित भारतासाठी महत्त्वाचा उपक्रम
यावेळी बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “डिपेक्ससारखे उपक्रम विकसित भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. केवळ पदवी मिळवणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय नसून संशोधन, नवकल्पना आणि समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. अशा प्रदर्शनांमुळे त्यांच्या कल्पनांना दिशा, व्यासपीठ आणि उद्योगक्षेत्राशी जोड मिळते. शासन पातळीवरून नवोपक्रम आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
‘डिपेक्स-२०२६’ हे राज्यातील युवा संशोधकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
———-
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
