पुणे, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : भाजपाचे नेते तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे रात्री सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करित त्यांच्या अंगावर शाई फेकून निषेध नोंदविला. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी पक्षाचे नेता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार पुणे दौर्यावर होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या घटनेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीचे समर्थन करीत नाही आणि ते योग्य नाही. आम्हीदेखील आंदोलन करू शकलो असतो. बसेस जाळू शकलो असतो, पण आम्ही तरुणांच्या प्रश्नावर शांततेच्या मार्गाने युवा संघर्ष यात्रा काढत आहे.
हिंदुस्थान समाचार
