रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : गणपतीपुळे येथे व्हेल माशाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले. व्हेलला जिवंत पाण्यात सोडण्याचे हे देशातील पहिले रेस्क्यू ऑपरेशन ठरले आहे.
तब्बल ४० तास व्हेलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर काल रात्री उशिरा व्हेल माशाचे पिल्लू समुद्रात सुखरूप गेले.
व्हेल हा सस्तन प्राणी आहे. सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर असल्याचे दिसून आले. त्यावेळी जवळपास तीन वेळा त्या पिल्लाला समुद्रात सोडले गेले. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा ”ऑपरेशन व्हेल” सुरू करून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सोडण्यात ४० तासांनंतर यश आले.
कोस्ट गार्डसह सर्वच विभागांनी यामध्ये पुढाकार घेत अखेर व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सुखरूप सोडले. समुद्रामध्ये जवळपास ४ ते ५ किलोमीटर आतमध्ये या पिल्लाला सोडल्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सर्वांनी जल्लोष केला.
हे ऑपरेशन यशस्वी झालेले असले तरी इतर कुठल्या भागामध्ये हे पिल्लू किनारपट्टीवर मागे फिरत नाही ना, याकडे सध्या लक्ष ठेवले जात आहे.
हिंदुस्थान समाचार
