सोलापूर, 21 सप्टेंबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात पोलिसांत चर्चेचा विषय झालेले बार्शी तालुका गांजा प्रकरण. भोयरे रस्त्यावर दोन ट्रक व एक कार थांबवून १ कोटी ६० लाख रुपयांचा ६९२ किलो गांजा जप्त करण्यात आला होता.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कोठून येत होता? याचा सखोल तपास पोलिस यंत्रणा घेत असताना संबळपूर (ओरिसा) राज्यातून गांजा महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळाली. कारवाईमुळे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांचेसह पथकाचा सन्मान केला. सुरुवातीस पोलिसांनी एकास अटक केली होती.
तपास करीत असताना आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये अंकुश दशरथ बांगर (वय-३६, रा. भोयरे, ता. बार्शी, जि. सोलापूर), दयानंद महादेव आरकिले (वय-२६, रा. श्रीपतपिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापूर), संतोष अनिल गायकवाड (रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), अमृत महादेव इथापे (वय-३२, रा. चिंचोली, ता. आष्टी, जि. बीड), आनंद विलास काळे (वय-३९, रा. मसोबागल्ली, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), दिग्विजय उर्फ राज सुभाष घोळवे (वय-३०, रा. कॅन्सर हॉस्पीटलजवळ, बार्शी, जि. सोलापूर), कृष्णा विठ्ठल दुरगुळे (वय-३०, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव), बालाजी उत्तम कदम (वय-४३, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी न्यायालयीन कोठडीत असलेल्यांची नावे आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
