अभियंत्यांनी दार तोडून दीड तासांनी केली सुटका
बंगळुरू, 17 जानेवारी (हिं.स.) : मुंबईहून कर्नाटकच्या बंगळुरूला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाच्या टॉयलेटमध्ये एक प्रवासी अडकून पडल्याची घटना घडली. टॉयलेटचे दार लॉक झाल्याने हा प्रवासी तब्बल दीड तास (100 मिनीटे) शौचालयात अकडून होता. शेवटी बंगळुरूच्या कॅम्पेगौडा विमानतळावरील अभियंत्यांनी टॉयलेटचे तार तोडून या प्रवाशाची सुटका केली.
स्पाइसजेटचे विमान (फ्लाइट एसजी- 268) सोमवारी रात्री 10.55 वाजता उड्डाण करणार होते. मात्र, काही कारणास्तव उशीर झाल्याने हे विमान मंगळवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास बंगळुरूच्या दिशेने रवाना झाले. या विमानात प्रवाशासोबत घडलेल्या घटनेसंबंधित एअरलाइन कंपनी स्पाईसजेटनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यासंदर्भात ग्राउंड स्टाफच्या एका सदस्याने सांगितले की, स्पाइसजेटच्या मुंबई- बंगळुरू विमानातील सीट क्र. 14-डी वर बसलेला प्रवासी विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेच शौचालयात गेला. मात्र, शौचालयाचा दरवाजा खराब झाल्यामुळे तो आत अडकला. शौचालयात अडकल्याचे समजताच संबंधित प्रवाशाने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर विमानातील क्रू मेंबर्स धावून आले. त्यांनी शौचालयाचा दरवाजा बाहेरून उघडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, प्रवाशाला त्याचा संपूर्ण प्रवास शौचालयात बसूनच करावा लागला. दरम्यान, मंगळवारी पहाटे 3.43 वाजता विमान बंगळुरूच्या कॅम्पैगौडा विमानतळावर लँड झाले. त्यानंतर इंजिनियर विमानात चढले. त्यांनी दरवाजा तोडला आणि दोन तासांच्या मेहनतीनंतर त्या व्यक्तीला शौचालयातून बाहेर काढले. प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. क्लस्ट्रोफोबियामुळे प्रवासी अस्वस्थ झाला होता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
हिंदुस्थान समाचार
