नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील घटना
नागपूर, 17 डिसेंबर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील ‘सोलार एक्सप्लोसिव्ह’ कारखान्यात आज, रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आलीय. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि रसायने असल्यामुळे यात जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. सत्यनारायण नुवाल यांच्या मालकीची ‘सोलार एक्सप्लोसिव्ह’ ही कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा सप्लाय करते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करत असल्याची माहिती आहे. ‘एक्सप्लोसिव्ह’मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, या स्फोटात कारखान्यातील केसीबीएच-2 ची एक इमारत उध्वस्त झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
