मुंबई, १६ डिसेंबर (हिं.स.) : संसदेत घुसखोरी करून धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. त्या नळकांड्या कल्याणमधून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कल्याणमधील अहिल्याबाई चौकातील एका फटाके विक्रेत्याची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी संसदेत वापरलेले धुराच्या नळकांड्या लहान आकाराच्या होत्या. आमच्याकडे मोठ्या आकाराच्या नळकांड्या असल्याचे दुकानदाराने पोलिसांना सांगितले. अशाच पध्दतीने इतर दुकानदारांची चौकशी केली जात आहे.
कोणत्या धूर नळकांड्या किती क्षमतेच्या असतात. त्यांच्यामुळे किती नुकसान होऊ शकते अशीही माहिती पोलीस दुकानदारांकडून घेत आहेत. स्थानिक पोलिसांना याबाबत विचारणा केली असता, त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेने आम्हाला कोणत्याही दुकानांची माहिती दिली नाही. याबाबत ही माहिती समजल्यानंतर आमचे पथक ते दुकान शोधत आहे. स्थानिक पोलिसांनी कल्याणमधील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना लोकसभेत तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सदस्यांच्या बाकावर उड्या मारल्या. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. तरुणांनी धुराच्या नळकांड्याही फोडल्या. या घटनेनंतर नवीन संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पाच आरोपींना अटक केल्यानंतर सहावा आरोपीही पोलिसांसमोर शरण आला. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली. याचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील कल्याणपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जातं आहे. तरुणांनी फोडलेल्या धुराच्या नळकांड्या या कल्याणमधून खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.
हिंदुस्थान समाचार
